मंजिरी…

बंद दाराकडे पाठ करुन
बसलोय पायरीवर इतक्या वर्षांनी…
तू अंगणात तुळशीसमोर
दिवा लावायला आलीस..
पाठमोरी होऊन पुन्हा
घरात जाणार
तोच मागे वळून बघितलस…
तू थबकणार, मागे वळून बघणार
हे मला माहितच होतं…
तू पुन्हा आत जाते आहेस
पण कुठल्यातरी कारणाने
मुद्दामहुन बाहेर येशीलच
मी तिथेच बसलेलो असेन…
कधी नव्हे तो मी
तुला आरपार बघणार
तुझ्या चेहऱ्यावर आजही
ना प्रश्नचिन्ह, ना कुतूहल…
झालच तर निळयाभोर डोळ्यात
कधीकाळचं साठलेलं एक आभाळ…

मी खरच एका संध्याकाळी
तुझ्या
अंगणातली
मंजिरी
खुडायचं
पाप
करु..?

– श्रीपाद जोशी

Leave a comment