छप्पर

घर होते पण स्वतःस बेघर केले
आकाशाला माझे छप्पर केले

जेव्हा जेव्हा भरले माझे डोळे
डोळ्यांना या खुशाल सागर केले

तुझ्या नि माझ्यावरती लिहिले होते
शेर कधी ते नाही सादर केले

खूप उडाला होता फुगा मनाचा
मनास माझ्या कोणी पंक्चर केले?

आधी तर हे तळेच होते केवळ
नंतर त्याचे शांत सरोवर केले

गंध तुझ्या स्पर्शाचा झाला होता
रात्र उगाळुन माझे अत्तर केले

आधी माया पाझरल्यावर नंतर
या मोहाने जंतरमंतर केले

प्रवाह नेला आटत हळूहळू अन्
सारे विभ्रम नंतर निर्झर केले

असे खरे तर नको कराया होते
निघताना तू कशास कातर केले?

:- Shripad Arun Joshi
दोन हजार चोविसचा एक मार्च
रात्रीचे साडे दहा

Leave a comment